महाराष्ट्र

दादा भुसेंकडून संजय राऊत यांच्याविरुद्धचा अब्रुनुकसानीचा दावा मागे

मालेगाव : खासदार संजय राऊत यांनी न्यायालयात आणि माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत दिलगिरी व्यक्त केली. चुकीच्या माहितीच्या आधारे आपण मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केल्याचे त्यांनी मान्य केले. विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्याला मिळालेली माहिती चुकीची होती आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मालेगावच्या शेतक-यांची माफी मागत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मालेगाव येथील न्यायालयात घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वत: उपस्थित राहिले होते.

या प्रसंगी दादा भुसे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. राऊत यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आपण अब्रुनुकसानीचा दावा मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मालेगावच्या शेतक-यांचा आणि नागरिकांचा संभ्रम, तसेच त्यांच्या भावना लक्षात घेता हा विषय वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय आता संपला आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी नमूद केले.

वादाची पार्श्वभूमी १७८ कोटी रुपयांच्या कथित शेअर्स घोटाळ्याशी संबंधित होती. संजय राऊत यांनी सामाजिक माध्यमांवर हा आरोप केला होता. दादा भुसे यांनी तो आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत आधीच स्पष्टीकरण दिल्याचे नमूद केले. संबंधित सर्व पैसे आर्मस्ट्राँग कंपनीकडे ट्रान्सफर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही आरोप मागे घेतले गेले नाहीत, म्हणूनच मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिली : दादा भुसे

यावेळी दादा भुसे यांनी सांगितले की, काही व्यक्तींनी चुकीची माहिती पसरवून हा वाद निर्माण केला. ज्यांच्याकडून माहिती आली तेही आता दुस-या पक्षात गेले असल्याचे सूचक विधान करण्यात आले. अद्वय हिरे यांनी चुकीची माहिती दिल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. मात्र राऊत यांनी स्वत: आरोप मागे घेतल्याने आणि खोटेपणा मान्य केल्याने पुढील कारवाईची गरज उरली नसल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.

वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य : खासदार संजय राऊत

संजय राऊत यांनीही दादा भुसे आणि माझे चांगले संबंध आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे म्हणत विषयाला मैत्रीपूर्ण शेवट दिला. राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक पातळीवर संवाद आणि समज कायम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वाद वाढवण्यापेक्षा संपवणे योग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एकंदरीत, न्यायालयात सुरू झालेला हा वाद अखेर समझोत्याने मिटला.

Related Articles

Back to top button