सिंहगड रोडवर महिलेच्या अंगावर झाड कोसळून महिलेचा मृत्यू
पुणे : शहरात झालेल्या अवकाळी पावसात फूल विक्रीसाठी बसलेल्या महिलेच्या अंगावर झाड कोसळले. यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिराजवळ घडली. रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रंजना गिरी गुरुवारी हनुमान जयंती असल्याने सकाळीपासून सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिराजवळ फूल विक्रीसाठी बसलेल्या होत्या. मंदिराशेजारी त्यांची फूल विक्रीची टपरी होती.
दरम्यान, दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले. यात महिला अडकली गेली. गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.




