मंत्री नरहरी झिरवाळ व्हायरल अश्लील व्हीडीओ प्रकरणी सत्यता पडताळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दोषी आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या एका कथित आक्षेपार्ह व्हीडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ एका गंभीर वादाच्या भोव-यात अडकले आहेत. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा त्यांचा अश्लील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी आता झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे.
गुरुवारी रात्रीपासून सोशल मीडियावर एक व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडीओमध्ये मंत्री झिरवाळ एका शासकीय निवासस्थानी एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत असल्याचा दावा केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, या व्हीडीओमधील व्यक्ती ही पवन यादव नावाची ट्रान्सवुमन असून तिच्या भावानेच हे प्रकरण उघडकीस आणल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, पवन यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात यापूर्वीच खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
शासकीय निवासस्थानी मद्य आणि अश्लील कृत्य?
व्हायरल व्हीडीओमध्ये मंत्र्यांच्या खासगी कक्षात मद्यप्राशन आणि अश्लील कृत्य होत असल्याचे दिसत असल्याने प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे. हा व्हीडीओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात असून तो जाणीवपूर्वक आताच बाहेर काढण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मात्र ही झिरवाळ यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी रचलेला कट असल्याची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करुन असं सांगितले की हा व्हीडीओ तीन ते चार व्हीडीओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला गेला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी तात्काळ यासंदर्भात एक तक्रार दाखल करावी असा सल्ला मी त्यांना दिला आहे. या व्हीडीओची शहानिशा करण्यात येईल आणि जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून एकत्र निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सत्य असतील तर त्याच्यावर कारवाई होईल
मागच्या वेळी जी घटना झाली त्याची चौकशी केली असता त्यात झिरवाळांचा संबंध नसल्याचे समोर आले. आता जे व्हीडीओ समोर आले आहेत ते गंभीर असून त्याची सत्यता पडताळणे गरजेचे आहे. ते सत्य असतील तर त्याच्यावर कारवाई होईलच, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.




