राजकीयसामाजिक

लोणी-काळभोर ग्रामपंचायतीचा निर्णय रखडला; लोकवस्तीत पाच दिवसांपासून कचऱ्याचे ढीग

लोणी-काळभोर : पुणे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मुळा-मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायती तसेच परिसरातील काही गावांकडून बेकायदेशीरपणे दररोज कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे. परिणामी, दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत गेल्या पाच दिवसांपासून कचरा न उचलल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराविरोधात विद्यार्थ्यांनी प्रथम दि. ४ मार्च २०२६ रोजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कचरा बंद’ आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलिस उपआयुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायतींना कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती.

मात्र, मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकणे सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा १३ मार्च २०२६ रोजी आंदोलन छेडत नदीपात्राकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अडविले. आंदोलन सुरू होऊन पाच दिवस उलटूनही कोणताही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप कायम आहे.

दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नदीपात्रात साठलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागली होती. सलग चार दिवस ही आग धुमसत राहिल्याने परिसरात प्रचंड विषारी धूर पसरला. यामुळे एमआयटी शैक्षणिक संकुलातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास व गुदमरल्याची लक्षणे जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली.

यानंतर हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी नदीत थेट टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. मात्र, या गंभीर प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही.

Related Articles

Back to top button