अबब! मुंबईपेक्षा पुण्यात अधिक मतदार ; एकूण ८२ लाख ८२ हजारांची नोंद

पुणे: पुण्यात राज्यातील सर्वाधिक मतदार असून एकूण मतदार संख्या ८२ लाख ८२ हजार आहे. पुण्याचे हवामान, पाण्याची उपलब्धता तसेच शैक्षणिक आणि नोकरीच्या सुविधा यामुळे पुण्यात सर्वाधिक मतदार संख्या असून मुंबई पेक्षा ९ लाख मतदार पुण्यात अधिक असल्याचे निवडणूक आयोगाच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.
राज्यात ८ एप्रिल पर्यंत एकूण ९ कोटी २४ लाख ९१ हजार मतदारांची नोंद झाली आहे. ४ कोटी ८० लाख ८१ हजार पुरुष तर ४ कोटी ४४ लाख ४ हजार महिला मतदार आहेत .५ हजार ६१७ तृतीयपंथी मतदार आहेत.
राज्यात १९ व २६ एप्रिल, ७,१३ मे आणि २० मे अशा पाच टप्प्यात मतदान होत आहे. राजधानी मुंबईची उपनगरांसह एकूण मतदार संख्या ७३ लाख ५६ हजार आहे. लगतच्या ठाण्याची एकूण मतदार संख्या ६५ लाख ७९ हजार, नाशिक जिल्ह्याची एकूण मतदार संख्या ४८ लाख ८ हजार इतकी आहे. तर नागपूरची एकूण मतदार संख्या ४२ लाख ७२ हजार आहे.
अहमदनगर म्हणजे अहिल्यादेवी नगर, सोलापूर, जळगाव, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या पाच जिल्ह्यांमध्ये ३० लाखांहून अधिक मतदार आहेत. नगरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार आहेत. सोलापूरमध्ये एकूण मतदार ३६ लाख ४७ हजार आहेत. जळगावमध्ये एकूण मतदार ३५ लाख २२ हजार आहेत. कोल्हापूरमध्ये एकूण मतदार ३१ लाख ७२ हजार आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण मतदार ३० लाख ४८ हजार आहेत.
बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, रायगड, मुंबई,बीड, सातारा,सांगली, पालघर या १० जिल्ह्यात प्रत्येकी २० लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत.




