वाघोलीत गुन्हेगारीला वाव; हाॅटेल्स मध्ये बेकायदेशीर दारू विक्री, पान टपऱ्यावर गुटखा आणि गुंगी येणाऱ्या पानामुळे तरुण मुले व्यसनाच्या विळख्यात
बेकायदेशीर दारू विक्रेत्यांकडून हप्ते वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कारवाई करणार का?

पुणे : वाघोली परिसरात हाॅटेल मध्ये रात्रभर मोठ्या प्रमाणात विनापरवाना दारु विक्री जोरात सुरू आहे. या दारू विक्रीला वाघोली पोलीस स्टेशनचाच तिकोणे नावाचा पोलीस कर्मचारी खतपाणी घालत असल्याची चर्चा आहे.
काही ठिकाणी अनेक बार मधून ‘टॅंगो’ या देशी दारुची विक्री केली जाते. बार आणि परमिट रूम मध्ये ‘टॅंगो’ सारखी दारु विकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक असते मात्र तो नियम धाब्यावर बसवणारे धंदेवाईक या निमशहरी भागात फोफावत आहेत. जाग्स कॉर्नर, छत्रपती हॉटेल, अण्णा गार्डन ढाबा येथे लायसन्स नाही, परंतु सर्व प्रकारची दारू विक्री सुरू आहे.
जगदंबा हॉटेल, दुर्गा हॉटेल मध्ये अशीच परिस्थिती आहे. जे. जे बार मध्ये आणि जुई बार मध्ये देशी दारू विक्री सुरू आहे. लायसन्स आहे मात्र देशी टँगो पंच दारू विक्रीसाठी जो परवाना आवश्यक असतो तो नाही असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या हॉटेल्ससह अन्य काही हॉटेल्स मध्ये रात्रभर मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असून या ठिकाणी अल्पवयीन मुलांना खुलेआम दारू देण्यात येत असल्याने संबंधित भागात गुन्हेगारीला वाव मिळत आहे. या सर्व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्स कडून तिकोणे नावाचा पोलीस हप्ते वसुली करत खतपाणी घालत असल्यानेच असे धंदे मागील काही महिन्यांपासून वाघोलीत वाढीस आले आहेत अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
खून के प्यासे !
मध्यंतरी ‘प्यासा’ बार समोर एका तरुणाचा अतिशय क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर सुध्दा रात्री ११ नंतर मद्यविक्री सुरू असल्याचे हे परिणाम आहेत. त्यामुळे किमान बेकायदेशीर आणि अपरात्री सुरू असलेली दारू विक्री बंद ठेवावी आणि अश्या बेकायदेशीर दारू विक्रीला खतपाणी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाघोली परिसरामध्ये सुगंधी मावा, गुंगी येणाऱ्या पानाची खुलेआम विक्री

महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या सुगंधी मावा व गुंगी येणाऱ्या पानाची वाघोली परिसरामध्ये पान टपऱ्यावर खुलेआम विक्री सुरू असून वारकरी आणि महाविद्यालय तरुण मुले व्यसनाच्या विळख्यात गुरफटत आहेत. वाघोलीत पान टपऱ्यावर सुगंधी मावा, गुंगी येणारे पान विक्रीचा मोठा बाजार सुरू आहे.

साधारण ५० ते ७५ रुपयांच्या किमतीत मिळणाऱ्या या पानामुळे गुंगी येते अन् त्याची चटकही लागते. सलग काही दिवस खाल्ल्यावर या पानांशिवाय करमतच नसल्याचा प्रकार आहे. यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
इयत्ता आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन मुला-मुलींमध्येही हे पान सध्या चांगलेच चर्चेत आणि लोकप्रिय आहे.
पान टपऱ्यावर बंदी असलेल्या सुगंधी मावा व गुंगी येणाऱ्या पान विक्रीवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने व्यसनाधीनता फैलावत जाईल, अशी भिती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.




