
अमरावती : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती व्यंकटेश्वर मंदिरातील लाडू प्रसादाचा वाद वाढला आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा करत सांगितले की, लाडू तयार करण्यासाठी वापरण्यात येणा-या तुपात बाथरूम साफ करण्याचे केमिकल मिसळण्यात आले होते.
कुर्नूल येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना नायडू म्हणाले ही भेसळ केवळ तिरुपतीपुरती मर्यादित नसून श्रीशैलम मंदिरातही असाच प्रकार घडल्याची शक्यता आहे. नायडूंनी हे वक्तव्य अशा वेळी केले आहे, जेव्हा एसआर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर खोटे आरोप करत असल्याचा ठपका ठेवला होता. याआधी नायडूंनी लाडूमधील तुपात बीफ टॅलो आणि डुकराची चरबी मिसळल्याचा आरोप केला होता. मात्र सीबीआयच्या चार्जशीटनुसार तुपात प्राणिजन्य चरबी आढळली नाही. मात्र वनस्पती तेल आणि काही रसायनांचा वापर करून तुपात भेसळ करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
ही भेसळ २०१९ ते २०२४ या काळात झाल्याचा आरोप असून, त्या काळात राज्यात वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते.
नायडूंच्या तेलुगु देसम पार्टीने, निवेदनात म्हटले आहे की सीबीआयच्या चार्जशीटनंतर भाविकांमध्ये तीव्र संताप आहे. लाडूमध्ये टॉयलेट साफ करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल मिसळल्याचा प्रकार समोर येणे अत्यंत धक्कादायक आहे असे पक्षाने म्हटले.
टीडीपीच्या माहितीनुसार, मार्च २०२२ ते मे २०२४ या कालावधीत आरोपींनी वेगवेगळ्या नावांनी बनावट बिले तयार केली. या काळात सुमारे ८,९०० किलो एलएबीएसए/ ऍसिड स्लरी आणि लॅक्टिक ऍसिड पुरवण्यात आले, असा आरोप आहे. एलएबीएसए हे रासायनिक द्रव्य असून ते गिळल्यास गंभीर इजा किंवा मृत्यूही होऊ शकतो, असा दावा टीडीपीने केला आहे.
सर्व आरोप राजकीय फायद्यासाठी
एसआर काँग्रेसने हे सर्व आरोप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. जगन मोहन रेड्डी यांनी सांगितले की, सीबीआयच्या अहवालात प्राणिजन्य चरबीचा उल्लेख नाही आणि वायएसआरसीपीशी संबंधित कोणाचेही नाव चार्जशीटमध्ये नाही.



