गुन्हेमहाराष्ट्रसामाजिक

कोरेगाव भीमा येथे तीन कॉलेजेसच्या परिसरातच जुगार अड्डा जोमाने सुरू; ग्रामीण पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप  

पुणे : कोरेगाव भीमा येथे पिंपळे जगताप रोडवर तीन कॉलेजेसच्या परिसरात जुगार माफिया बिनधास्त तीन पानी पत्त्याचा क्लब जुगार अड्डा चालवत आहेत. ग्रामीण पोलिसांचे या अवैध धंद्याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे.

पिंपळे जगताप रोडवर अल-अमीन एज्युकेशनल मेडिकल कॉलेज आहे. याच कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर जुगार अड्डा दिवसाढवळ्या सुरू आहे. काशिद नावाच्या इसमाचा फार्म हाऊस असून त्यात बापू भांडलकर आणि मख्खनसिंग नावाचे जुगार माफिया गुंड प्रवृत्तीच्या जुगाऱ्यांना आश्रय देत आहेत.

अल-अमीन एज्युकेशनल मेडिकल कॉलेजसह शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ बी.एड. आणि न्यूलाइफ हॉस्पिटल अँड आयुर्वेदिक कॉलेज अशी तीन कॉलेजेस आहेत या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शेजारीच असा दिवस रात्र जुगार अड्डा खुलेआम सुरू असल्याने अनेक पालकांकडून मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा जुगार अड्डा दिवस रात्र सुरू आहे.‌ पैसे लावून तो खेळला जातो. या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी पुण्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात जुगारी येत आहेत. यामध्ये अनेक गुंड प्रवृत्तीचे इसम असून त्यांचा या ठिकाणी वावर अधिक वाढत चालला आहे. या परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक पोलीस प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जात नाही. जुगार अड्ड्यावर तात्काळ कारवाई करावी अशी विनंती पालक मंडळी स्थानिक राजकीय नेत्यांना करत असूनही त्यांचे दुर्लक्ष होत आहे.

वसुली दादाचा आशीर्वाद?

जितेंद्र पानसरे नामक पोलीस फौजदार या साऱ्या अवैध धंद्यामागे असल्याचे बोलले जाते. तो शिक्रापूर परिसरात मोठ्या प्रमाणात हप्ता वसुली करुन अवैध धंद्यांना अभय देत असल्याने सामान्य नागरिकांना उपद्रव होत आहे. त्याच्या विरोधात तक्रारी व आंदोलन करुनही ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनीच त्यांचा खास पथका मार्फत जुगार धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

Related Articles

Back to top button