राष्ट्रीय

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू आणि इंडिगोच्या सीईओंची बैठक 

नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईन्सचे सीईओ पीटर अल्बर्स यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मुख्यालयात बोलावण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत मंत्री राम मोहन नायडू आणि सचिव समीर सिन्हा यांनी ऑपरेशन्स, प्रवाशांची काळजी, परतफेड आणि सामानाची स्थिती यावर चर्चा केली. ऑपरेशनल संकटानंतर इंडिगोने सर्व उड्डाणे पुन्हा सुरू केल्याची आणि १८०० हून अधिक उड्डाणे सुरू केल्याची माहिती दिली. यावेळी मंत्र्यांनी इंडिगोच्या अधिका-यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाईन्सच्या सीईओंना बोलावून अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच विमाने रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने इंडिगोला विमान वेळापत्रकात १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. गेल्या आठवड्यात इंडिगोच्या क्रू रोस्टर, फ्लाईट वेळापत्रक आणि संवादाचा अभाव यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. या प्रकरणात चौकशी आणि आवश्यक कारवाई सुरू आहे. पुन्हा एकदा इंडिगोच्या गोंधळाचा आढावा घेण्यासाठी इंडिगोच्या व्यवस्थापनाबरोबर एक बैठक पार पडली. या बैठकीत इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स उपस्थित होते.

यावेळी त्यांनी विलंब झालेल्या आणि रद्द झालेल्या विमानांच्या तिकिटाचा प्रवाशांना १०० टक्के परतावा दिला आहे. उर्वरित परतावा आणि प्रवाशांचे साहित्य हस्तांतरित करण्याचे काम जलद पद्धतीने सुरू आहे, असे नायडू म्हणाले. सरकारला इंडिगोचे मार्ग कमी करणे आवश्यक वाटते. त्यामुळे विमान कंपनीचे कामकाज स्थिर होण्यास मदत होईल. त्यामुळे इंडिगोच्या एकूण उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले. यानंतर इंडिगो पूर्वीप्रमाणेच त्यांच्या सर्व गंतव्यस्थानांना कव्हर करीत राहील. शिवाय मंत्रालयाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button