महाराष्ट्रराजकीय

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची निवड; शिवसेनेकडून संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महापौरपद मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येणार आहे. मुंबईचा महापौर मराठीच होईल, असे भाजपाने निवडणुकीच्या प्रचारातच जाहीर केले होते. त्यानुसार भाजपाने महापौरपदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत महापौरपदाचा सस्पेन्स काल संपवला. तर उपमहापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी यांचे नाव जाहीर केले आहे. या दोघांनीच अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून तांत्रिक प्रक्रियेनंतर याबाबतची अधिकृत घोषणा होईल. ४४ वर्षानंतर भाजपकडे मुंबईचे महापौरपद आले आहे.

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजप महायुतीत जोरदार लढत झाली होती. २२७ पैकी ११८ जिंकून महायुतीने निसटते बहुमत मिळवले होते. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने एक वर्ष शिवसेनेला महापौरपद मिळावे यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न झाले. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणार हे स्पष्ट झाले होते. पहिल्यांदाच भाजपाला महापौरपद मिळणार असा सर्वांचा समज होता. पण १९८२ साली सर्वपक्षीय आघाडी होऊन भाजपचे प्रभाकर पै एक वर्षासाठी मुंबईचे महापौर झाले होते. त्यामुळे ४४ वर्षाच्या प्रदीर्घ परीक्षेनंतर भाजपाचा दुसरा महापौर सत्तेवर बसणार आहे.

भाजपकडून अनेक नावं चर्चेत होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी आज रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली. तर उपमहापौरपदासाठी शिवसेना शिंदे गटाने संजय घाडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. संजय घाडी सव्वा वर्षासाठी पदावर बसणार आहेत. सत्तेसाठी आवश्यक असलेली ११८ हे संख्याबळ महायुतीकडे आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार अशी चर्चा होती. परंतु भाजपाने मराठी उमेदवार दिल्याचे सांगून शिवसेना ठाकरे गटाने माघार घेतली. त्यामुळे आता या दोघांची बिनविरोध निवड

होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.

रितू तावडे यांच्या रूपाने गेल्या ४४ वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचा महापौर बसणार आहे. मात्र रितू तावडे यांच्यासाठी ही लढाई सोपी नसणार आहे. समोर शिवसेना ठाकरे गटातील चार माजी महापौरांसह महापालिकेचे राजकारण कोळून प्यायलेल्या ज्येष्ठ नगरसेवकांचे आव्हान असणार आहे. विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर आणि मिलिंद वैदय या चार माजी महापौरांचा समावेश आहे. गेल्या पंचवीस वर्षांहूनही अधिक काळ मुंबईचे महापौरपद शिवसेनेकडे होते. यंदा भाजपाने कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर आपलाच असावा असा चंग बांधला होता. त्यात अखेर भाजपाला यश आले आहे. रितू तावडे प्रभाग क्रमांक १३२ मधून भाजपाच्या नगरसेविका आहेत. त्या दोन टर्म नगरसेविका आहेत. याआधी त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद, स्थापत्य समितीचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची त्यांना चांगली जाण आहे. भाजपाचा ईशान्य मुंबईतील चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

Related Articles

Back to top button