सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सहावीत शिकणारी एक विद्यार्थिनी शाळेनंतर घरी जात असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला आहे.
सायकल वरून घरी येणाऱ्या मुलीला रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवून तिच्यावर ॲसिड टाकण्यात आलं. ११.३० ते १२.४५ दरम्यान ही घटना घडली आहे.
नागरिकांनी जखमी मुलीला डॉक्टर जम्बुकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले नंतर लोणी इथल्या रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याचे बाजूने 7 टक्के भाजलेला आहे.
जखमी असलेल्या मुलीकडे पोलिसांनी प्राथमिक विचारपूस केली आहे आणि उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे.
मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शी कडून मिळालेली माहिती या सगळ्या आधारे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास सुरू केला आहे.
मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथे ही तपास सुरू केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत.




